तयांच्या कळा!!

      काल दि. १४/०१/२०१८ रोजी ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथील युवकांच्या गटाचा 'सहाध्याय सहल - कोरेगाव भीमा व वढु' हा उपक्रम झाला.
      आमचा सतरा जणांचा गट आकाश दादा, स्वप्निल दादा आणि अनिश दादा यांच्यासोबत कोरेगाव भीमा आणि वढु येथे जाण्यास सज्ज झाला. सर्वजण प्रबोधिनीत जमले.
      भेट देण्याअगोदर तेथील परिस्थिती, विजयस्तंभाचा इतिहास हा आकाश दादा आणि स्वप्निलदादाने सांगितला व त्या विषयावर चर्चा झाली. या चर्चेत हे का घडले व याचे गांभिर्य समजावुन घेण्यात आले. या चर्चेनंतर गट कोरेगाव भीमाला १:३० वा. निघाला.
      कोरेगाव भीमा या ठिकाणी गेल्यावर आम्हाला आमच्या दंगलीबाबतीच्या अज्ञानाची जाणीव झाली!!
      कोरेगाव भीमा येथील जाळपोळ व नुकसान बघता आपण किती "सेफ" आहोत याचा अंदाज आला तसेच आपण किती "भोळे" आहोत याचाही प्रत्यय आला. कोरेगाव भीमा येथे आम्ही एका कुटुंबाला भेट दिली. ज्यांचं फक्त तीन लोकांचं कुटंब होतं - नवरा, बायको व एक अंध, मतिमंद मुलगी! त्यांचं १ तारखेच्या जाळपोळीत सगळंच् गमावलं. नाही! मुद्दामहुन, आपल्यासारख्या १९ ते २५ वर्षांपर्यंतच्या युवकांकडुन त्यांच्या स्वतःच्या जातिय यदाकदाचित राजकिय फायद्यासाठी जाळलं गेलं होतं! पण या जातिय अथवा राजकिय फायद्यात त्या बेकसुर कुटुबांचं आजपर्यंत कष्टाने मुलीसाठी तिच्या भविष्यासाठी कमावलेलं सर्व विश्वच् गमावलं गेलं होतं. आणि त्यांचा तर याच्याशी काडीचाही संबंध नव्हता! त्यांची काय चुक होती? ते तर परिस्थितीतील तणाव पाहुन दुकान बंद करुन आपल्या दुकानाला लागुनच् आपल्या घरात बसले होते. पण जातियवाद्यांनी ना जात पाहिली ना ओळख ना हि गरिबी त्यांना तर फक्त राग आणि द्वेष व्यक्त करायचा होता! त्यांनी दुकानाचं शटर तोडुन आत जाळ लावुन दिला आणि क्षणातच् जेथे महिन्याभराचं धंद्याचं सामान होतं ते जळुन खाक झालं आणि राहिली फक्त राख! त्यानंतर जमावाने त्यांची राहायची रुमही पेटवुन दिली! गॅसचा स्फोट झाला. पीडित कुटुंबाने अपंग मुलीला वाचवत स्वतःचं सर्व तसंच ठेवत जीव वाचवण्याचं प्रयत्न केला पण 'त्या' माणसांनी त्यांच्या मागावर गच्चीवर जाऊन त्यांच्यावर तलवार, कोयत्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला! पण गावच्या तरुणांनी या कुटुंबाला वाचवण्यात यश मिळवले! असंच बऱ्याच ठिकाणी झालं होतं 'त्या' दिवशी जे की 'त्या' लोकांनी केलं होतं.
      काहीजणांच्या गाड्या पेटल्या होत्या तर काहींची गाड्यांची शोरुमं, काहींची दुकानं राख झालेली तर काहींची घरं! काहींच्या खिडक्या फुटलेल्या तर काहिंचे फक्त खिडक्यांचे अवशेष राहिलेले!
      यानंतर आम्ही विजयस्तंभ, छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधीस भेट दिली व त्यानंतर आम्ही परत प्रबोधिनीत आलो. पण कोरेगाव भीमा येथील जाळपोळीचे चटके अजुनही आम्हाला भाजत होते!
      कोण आहे कोण याला जबाबदार?
      'ते' जे आपल्यासारख्या तरुणांची माथी भडकावुन देतात का 'तो' तरुण वर्ग जो 'जातींच्या' नावांनी भरकटुन जातो?
      आता खरोखरीच विचार करायची वेळ आलीये! देशात जर नवतरुण शक्ती जर उदयास येणारच् असेल तर तिचा वापर देशाच्या भल्यासाठीच व्हावा! जर मोर्चे निघणारच् असतील तर ते देशविरोधी घटनांविरुद्धच् व्हावेत!
तयांच्या कळा जाणवाव्या अम्हाला,
तयांच्या सुखाचीच् लागो स्पृहा|
नमस्कार देवा तुला अामुचा हा,
करी आमुची मायभूमी महा||
या पंक्तींप्रमाणेच पीडित, शोषित लोकांच्या कळा आपल्याला कळायला हव्यात! 'त्या' लोकांच्याच् सुखाचीच् आपल्याला आस लागायला हवी! हे देवा आम्ही तुला नमस्कार करितो या आमच्या मायभुमीला महान कर!
      हिच खरी वेळ आहे तरुणांनी एकत्र येऊन समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडण्याची! एका सुशिक्षित आणि धर्मनिरपेक्ष समाज घडवण्याची!!

टिप:- यातले 'ते' कोणीही असू शकतात. कोणत्याही महापुरुषाला देव मानणारे आणि त्यांना जातींच्या छोट्या चौकटीत बांधून टाकणारे.. 'ते'.. तुमच्या आमच्यातले.. नाही.. नाही.. 'आपल्यातले'!!

Comments

  1. सत्याचा शोध अंतापर्यंत..

    ReplyDelete

Post a Comment